Monday 5 September 2016

फक्त एका देशामुळे दहशतवाद

होंगझोऊ (5 सप्टेंबर 2016) - जी -20 परिषदेच्या अखेरच्या  दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा समाचार घेतला. तसेच, "फक्त एक दक्षिण आशियाई देश  दहशतवाद पसरवित आहे”, अशी टीका त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केली. 

परिषदेच्या अखेरच्या सत्रात बोलताना मोदी म्हणाले, हिंसा आणि दहशतवादाची ताकद वाढत असल्याने जगासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. काही देश तर दहशतवादाचा वापर धोरण म्हणूनच करत आहेत. दक्षिण आशियामध्ये एकच देश असा आहे की तो दहशतवाद पसरवित असून, दहशतवाद्यांना साथ देत आहे. दहशतवादाला अजिबात थारा न देण्याचे भारताचे धोरण आहे. आमच्यासाठी प्रत्येक दहशतवादी सारखाच असल्याचे सांगून मोदी यांनी पाकिस्तानच्या चांगले दहशतवादी, वाईट दहशतवादी या कल्पनेची खिल्ली उडविली.

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी तातडीने एकत्र येण्याचे आवाहन मोदी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांना एकटे पाडून त्यांच्यावर निर्बंध लादावेत, दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. जगासमोर दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका ठळकपणे मांडण्याची संधी मोदींनी वेळोवेळी साधली आहे.

उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी
जी-20 परिषद चोख पार पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या चीनला आज त्यांच्या मित्रदेशाने तोंडघशी पाडले. परिषद संपत असतानाच उत्तर कोरियाने आज तीन क्षेपणास्त्रांची चाचणी घेत आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले. यामुळे परिषदेसाठी आलेल्या दक्षिण कोरियाच्या पार्क ग्वेन हे आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी तातडीची बैठक घेत परिस्थितीवर संयुक्तपणे लक्ष ठेवण्याचे मान्य केले. उत्तर कोरियाच्या चाचण्यांमुळे जगात अशांतता पसरत असून, चीनने त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही काही देशांनी केली.

No comments:

Post a Comment