Thursday 25 August 2016

मॅनेजमेंटचे शिकवणारी दहीहंडी

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे.
दहीहंडीच्या दिवशी गोविंदांचा नारा सर्वत्र घुमत असतो.
कृष्णाच्या लीलांची आठवण करून देणारा हा सण सध्या या दिवशी होणार्या भलत्याच लीलांमुळे गाजत असतो.

पण कृष्णलीला आजच्या काळात व्यवस्थापनाचेही धडे देणार्या आहेत. पारंपरिक सणांकडे पाहण्याचा आपला पारंपरिक दृष्टीकोन सोडत नाही तोपर्यंत त्यातील आधुनिकता आणि वर्तमान जीवनाशी त्याचा असलेला संबंधही आपल्या लक्षात येणार नाही.

आता दहीहंडी आपल्याला काय शिकवते ते पाहूया.

*एकच लक्ष्य.....*
सहकार्यांमध्ये ध्येयाची जाणीव करून द्यायला हवी. आपल्याला काय साध्य करायचे आहे आणि किती वेळातहे स्पष्ट केले पाहिजे. त्यासाठीआधी त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे. हे तुम्हीच करू शकता असा आत्मविश्वास त्यांच्यात जागवायला हवा. दहीहंडीतील एकाही थरातील एका व्यक्तीच्या जरी मनात आपल्या लक्ष्याविषयी संदेह असला तर तो कोसळायला वेळ लागत नाही.
तसेच आपल्या आयुष्यातील लक्ष्याचेही असते.
त्यामुळे हा संशय दूर करून सहकार्यांमधील क्षमता वाढवली पाहिजे.
आत्मविश्वास जागविल्यानंतर ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची त्यांची मानसिक तयारी होते व लक्ष्य साध्य करण्याची दृढता उत्पन्न होते.

*हम सब एक है....*
उचनीचत्वाची भावना काम करताना मनातून काढून टाकली पाहिजे. प्रत्येकाला एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यादृष्टीने त्याचे महत्त्वही आहे हे दहीहंडी शिकवते. कोणत्याही थरातील एखाद्या व्यक्तिचे महत्त्व नाही असे म्हटले तर दहीहंडी कोसळायला वेळ लागणार नाही. जमावाचे लक्ष्य दहीहंडी फोडणाऱ्याकडे असते.
पण थरातील सर्वांत खालचा माणूसही त्यावेळीमहत्त्वाचा असतो. तो जरा जरी हलला तरी वरच्या टोकावर असलेला माणूस कोसळू शकतो. म्हणून येथे लक्षात ठेवले पाहिजे हम सब एक है.

*एकमेका सहाय्य करू....*

एका गोविंदाने जरी सहकार्य करण्याचे नाकारले तर सर्व डोलारा कोसळू शकतो. म्हणूनच उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात. कारण त्यासाठी सर्वांचे सहकार्य नेमक्या वेळी मिळत नाही. ते जेव्हा मिळतात त्यावेळी हंडी फुटते. जीवनातील लक्ष्याचेही तसेच आहे. ते साध्य करण्यासाठी सर्व सहकार्यांचे सहकार्य हवे. ते नसले तर लक्ष्य साध्य करणे अवघड जाते. परस्परांविषयीची द्वेषभावना काढून टाकून एकदिलाने काम केल्यास यश आपलेच असते.

थोडक्यात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.

*प्रयत्न वाळूचे कण रगडिता....*

सात ते आठ थर उंच बांधलेली दहीहंडी फोडणे हे येर्यागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी नियोजित, सुसंघटित प्रयत्नांची गरज असते.
    हे प्रयत्नही कसे हवेत. तर सर्वांचे प्रयत्न एकाच वेळी, एकाच लक्ष्याच्या दिशेने व्हायला हवेत. त्याचबरोबर एकदा प्रयत्नात अपयश आले तरी हिंमत न हारता नव्या दमाने त्या दृष्टीने पुन्हा पुन्हा प्रयत्नकेले पाहिजे. या प्रयत्नाच्या प्रत्येकवेळी प्रत्येकाच्या मनात केवळ दहिहंडी फोडणे एवढाच विचार असायला हवा. अन्यथा यातील कुणीही चुकला तर थर कोसळायला वेळलागत नाही. आयुष्यात दिलेले काम पूर्ण करतानाही केवळ ते लक्ष्य डोळ्यासमोर हवे.
स्वतःला आणि आपल्या सहकाऱ्यांना त्या लक्ष्याच्या दिशेने वाहून घेतल्याशिवाय ते साध्य करणे अवघड जाते. थोडक्यात प्रयत्न वाळूचे रगडिता तेलही गळे.

*एक तीळ सात जणांनी...*
दहीहंडी फुटल्यानंतर गोपाळकाला करावा. गोपाळकाला उच्चनीचतेची भावना काढून टाकतो. सर्वांना एकापातळीवर आणतो. त्याचबरोबर लक्ष्य साध्य केल्यानंतर मिळणारा फायदा सर्वांमध्ये वाटून देण्याचा धडाही शिकवतो. यामुळे एवढे कष्ट केले तरी आपल्याला मात्र काहीच नाही ही भावना मनातून निघून जाते.
थोडक्यात एक तीळ सात जणांनी वाटून खावा ही भारतीय संस्कृतीची शिकवण हा उत्सव शिकवतो.

मॅनेजमेंटचे वेगवेगळे फंडे बिझनेस स्कूल्स शिकवत असतात. पण हे फंडे पारंपरिक सणांमधूनही शिकायला मिळतात. या सणांकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले तर ?

No comments:

Post a Comment