Saturday 2 May 2015

नव्या महाराष्ट्राचा ओनामा

जुन्या समस्या सुटता सुटत नाहीत आणि नव्या आव्हानांना खळ नाही, अशा कमालीच्या अस्वस्थ वर्तमानात 'संयुक्त महाराष्ट्र'  ५५ वर्षांचा होतो आहे. काही हजार वर्षांचा सांस्कृतिक, भाषिक वारसा असलेल्या या भूमीला १ मे १९६० रोजी ज्या नकाशाचा आकार आला त्या नकाशात आज काय स्थिती आहे? देशातील सर्वांत प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक असला तरी देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून जगभर तळपत असली तरी इतर बहुसंख्य शहरे अपुऱ्या सुविधांमुळे कोलमडून पडत आहेत. विकासाची स्वप्ने आकाशात झेपावत असली तरी भूमीतले पाणी पाताळात गेले आहे. सामाजिक प्रबोधनाचा वृथा डांगोरा कान किटवत असतानाच निःस्वार्थी, प्रामाणिक कार्यकर्त्यांचे खून पडत आहेत. त्यांच्या मरणाची व निष्फळ तपासाची आंच विविध क्षेत्रांत नेतेपद मिरवणाऱ्या कितीजणांच्या काळजाला लागली आहे? संयुक्त होऊन महाराष्ट्र सुखी झाला का, याचे एकमुखी उत्तर द्यायला विदर्भ, मराठवाडा आजही कचरतो आहे. 'कल्चरल कॉरिडॉर' असणाऱ्या महाराष्ट्राने उत्तर आणि दक्षिण या दोघांचे गुण आत्मसात केले, असे म्हटले जाते.  दोन्हीकडचे अवगुण आणून त्यात स्वतःची भर टाकण्यात तर महाराष्ट्र मश्गुल नाही ना? तसे नसते तर बेभान जमावाने हत्या करण्यापासून वाळीत टाकण्यापर्यंतच्या मध्ययुगीन वर्तनाला ऊत आला नसता.

महाराष्ट्राने ५५ वर्षांत काहीच साधले नाही, असे कोण म्हणेल? वेगवान औद्योगिक प्रगतीपासून फळबागांच्या क्रांतीपर्यंत व विक्रमी दूधउत्पादनापासून सर्वदूर शिक्षण नेण्यापर्यंत असंख्य कामे झाली. काही दशके सहकाराने
महाराष्ट्राची ध्वजा देशात उंच फडकवली. मराठी नाटके दुमदुमत राहिली. देश हलवणारे भ्रष्टाचाराच्या विरोधातले आंदोलन एका छोट्या गावात जन्मले. सामाजिक कामाच्या प्रत्येक प्रकारात मराठी माणूस आहे. देहदान ते रक्तदान आणि कुष्ठसेवा ते अपंग पुनर्वसन या साऱ्यांत महाराष्ट्राइतके काम कुठे झाले नसेल. तरीही,  ५५ वर्षांचा महाराष्ट्र सुखी आणि शांत नाही. असे का?

पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला जावे न लागता पाच-दहा वर्षे येथेच मिळाली असती, तर चित्र पालटून गेले असते, असे काही अभ्यासकांना वाटते.​ दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची प्रतिभा आणि प्रज्ञा चौफेर होती. मात्र, त्यांना मानणाऱ्या, अनुसरणाऱ्या सर्वांनी ही जबाबदारी का पेलू नये? उद्योगात पुढे म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आठ गाभ्याच्या क्षेत्रांचा विकासदर उणे झाला आहे. औद्योगिक उत्पादनवाढीचा वेग गेल्या आर्थिक वर्षात ४.२ टक्के होता. तो उणावून ३.५ टक्के झाला आहे. म्हणजे, ज्यासाठी महाराष्ट्राचे कौतुक तेथेही ही अवस्था. आजचा दिवस आनंदाचा, संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पुरे झाल्याचा आणि हुतात्म्यांना, वीरांना वंदन करण्याचा हे खरेच. पण या साऱ्या लढवय्यांनी ज्या महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले, त्या साऱ्या स्वप्नांची आज काय अवस्था आहे, याचे आत्मपरीक्षण केल्याशिवाय पुढे जाणार कसे? आता प्रत्येक कुटुंबाला वर्षभर प्यायला पुरेसे पाणी मिळावे आणि त्यांची जिरायतीही थोडीफार भिजावी, इथपासून पुन्हा सुरुवात करावी लागेल. 'स्मार्ट सिटी' हव्यात पण आमच्या शेतकऱ्याच्या गळ्यातील अदृश्य फासही काढून घ्यायला हवा. मेट्रो व महामार्ग हवेत पण बालमृत्यूही पूर्णपणे थांबायला हवेत. गोवंश जगूदे पण मानववंशही समाधानाने, स्वाभिमानाने राहूदे.

महाराष्ट्राच्या दाही दिशा उजळून निघू देत. तसे व्हायचे तर जगाच्या पाठीवरच्या व इथल्या प्रत्येक मराठी माणसाने तसा संकल्प सोडायला हवा. त्यासाठी महाराष्ट्र दिना इतका मंगल मुहूर्त दुसरा कोणता मिळणार?

No comments:

Post a Comment