Tuesday 27 January 2015

प्रजासत्ताक दिन संचलन 2015


प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशाच्या लष्करी सामर्थ्याचे आणि सांस्कृतिक वारश्याचे दर्शन


66 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान देशाचं लष्करी सामर्थ आणि समृध्द सांस्कृतिक विविधतेचे यथार्थ दर्शन घडवणाऱ्या प्रतिमांनी हा सोहळा रंगतदार ठरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देशाच्या विविधतेतून एकतेचा प्रत्यय देणाऱ्या सुमारे दोन तासांच्या या राजपथावरच्या संचलनाचे हजारो प्रेक्षकांनी हर्षोल्हासानं स्वागत केले. 21 तोफांच्या सलामीनंतर राष्ट्रपतींनी राष्ट्रध्वज फडकवला. त्यानंतर राष्ट्रगीत झाले आणि संचलनाला सुरुवात झाली.  त्यापूर्वी शांततेच्या काळातला सर्वोच्च शौर्य पुरस्कार, अशोकचक्र नायक नीरजकुमार सिंग आणि मेजर मुकुंद वरदराजन यांना मरणोत्तर बहाल करण्यात आला. काश्मीरमधल्या शोपीयन इथे दहशतवाद्यांच्या गटाशी झुंज देताना मेजर वरदराजन यांना तर कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना नायक नीरजकुमार यांना वीरमरण आले.
सागरी टेहळणी करणारी  आणि पाणबुडीवेधी लांब पल्ल्याची पी8आय विमाने तसेच लांब पल्ल्याचे प्रगत मिग 29के ही लढाऊ विमाने यावर्षीच्या संचलनाचे  प्रमुख आकर्षण होते.
जनरल ऑफिसर कमांडिग (दिल्ली) लेफ्टनंट जनरल सुब्रतो मित्रा यांच्या नेतृत्वाखाली लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने बॅन्डच्या तालावर राजपथावरुन शानदार संचलन केले. राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्यदलांचा सेनापती या नात्याने प्रणव मुखर्जी यांनी विशेष मंचावरुन सलामी स्वीकारली. देशाच्या सांस्कृतिक आणि विविधांगी वैविध्याची झलक दाखवणारे 25  रंगीबेरंगी चित्ररथ आकर्षणाचे केंद्र ठरले होते.शासनाच्या मेक इन इंडिया धोरणाचे प्रतीक चिन्ह असणारा अजस्त्र यांत्रिक सिंह आणि हायस्पीड बुलेट ट्रेन उपस्थितांची दाद घेऊन गेली.वित्त विभागाचा प्रधानमंत्री जनधन याजनेचा चित्ररथ तसेच महिला आणि बालकल्याण विभागाच्या बेटी बचावबेटी पढाव मोहिमेवर आधारित सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
 
यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना  महिला सबलीकरण होती. त्या अनुषंगाने सैन्याच्या तीनही  दलांच्या केवळ महिला अधिकाऱ्यांचे राजपथावर प्रथमच झालेले संचलनही लक्षवेधी ठरले. राज्यांच्या चित्ररथात सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतेचा पुतळा बनवण्याच्या  गुजरातच्या महत्त्वाकांक्षी  प्रकल्पाचे प्रतिकात्मक सादरीकरण  तसेच सरदार सरोवर योजनेचा समावेश होता. तर महाराष्ट्राने आपल्या चित्ररथात वारकरी आणि पंढरपूर यात्रेचा देखावा सादर केला. नवनिर्मित तेलंगण राज्याने बोनालू  उत्सवाचे दर्शन घडवले. 16 राज्यांनी चित्ररथ सादर केले.
हवाई दलाच्या जेट विमानांची चित्तथरारक  प्रात्यक्षिके  आणि सीमा सुरक्षा दलाच्या जांबाझ जवानांच्या मोटारसायकलवरच्या कसरतींना अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांचीदेखील  दाद मिळाली. 
 

No comments:

Post a Comment