Monday 15 December 2014

डेंग्यूला आळा.

डेंग्यूला आळा...कोरडा दिवस पाळा...
आपल्या आरोग्यावर सभोवतालच्या परिसराच्या अस्वच्छतेचा मोठा परिणाम होत असतो. अस्वच्छतेमुळे वाढणारे डास आणि माशा अनेक रोगांना कारणीभूत ठरतात. सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवला तर अनेक रोगांपासून आपण स्वत:चा आणि इतरांचादेखील बचाव करु शकतो. सध्या सर्वत्र धुमाकुळ घालणाऱ्या डेंग्यू या प्रसंगी जीवघेण्या ठरणाऱ्या आजाराला सुद्धा आपण सहजपणे दूर ठेऊ शकतो.
डेंग्यू ताप अत्यंत घातक आहे. एडिस ईजिप्ती या डासांची मादी साठवलेल्या किंवा साचून राहिलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालते. या अंड्यांचे रुपांतर डासामध्ये होते व हा डास चावल्यानंतर आपल्याला डेंग्यू हा आजार होतो. डेंग्यूचा डास हा दिवसाला चावा घेतो. या आजारात 2 ते 7 दिवस अंगात तीव्र स्वरूपाचा ताप येतो. डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, अंत:त्वचेतून रक्तस्त्राव, नाक/ तोंड रक्तस्त्राव, अंगावर पुरळ येणे. त्वचा थंड व निस्तेज होणे, रक्तदाब कमी होणे ही लक्षणे दिसतात. डेंग्यू तापात रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण झपाट्याने कमी होण्यास सुरूवात होते. प्लेटलेटचे प्रमाण कमी झाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. डेंग्यू तापाचे वेळीच निदान करणे शक्य आहे. यासाठी ताप आलेल्या रुग्णांनी आपले रक्तनमुने तातडीने नजिकच्या शासकीय रुग्णालयातून तपासून घेणे आवश्यक आहे.
डेंग्यू प्रतिबंध करण्यासाठी एडिस ईजिप्ती डासांची वाढ होऊ न देणे हा एकमेव उपाय आहे. यासाठी साथ काळात एडिस डासांची उत्पत्तीस्थाने शोधून त्यावर योग्य त्या उपाययोजना प्राधान्याने करणे गरजेचे आहे. एडिस डासांची उत्पत्ती मुख्यत्वे घरातील व परिसरात रांजण, हौद, पाण्याचे मोठे बॅरल, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, कारंजी, फुलदाण्या व घराच्या परिसरात टाकलेल्या निरुपयोगी वस्तुंमध्ये साठलेले स्वच्छ पाण्याचे साठे उदा. जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, रिकाम्या बाटल्या अशा ठिकाणी होते. अशाप्रकारे पाणी साचू नये यासाठी त्यांची त्वरित विल्हेवाट लावावी. घरातील पाण्याची टाकी, माठ, कुलर्स इ. पाणीसाठा करणारी साधने दररोज साफ करावीत. डास उत्पती होऊ शकणाऱ्या ‍ठिकाणी औषधाची फवारणी करुन घेण्यात यावी. सभोवतालच्या परिसरात पाणी साचून असणारी डबकी वाहती करावीत. तसेच डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडावीत. यामुळे तेथे डासांची पैदास होऊ शकणार नाही. शौचालयाच्या व्हेंटपाईपला जाळी बसवावी.
डासांची उत्पत्ती थांबविण्याबरोबरच त्यांच्या दंशापासून बचाव करुन देखील डेंग्यूला आपण दूर ठेऊ शकतो. याकरिता आपल्या दैनंदिन जीवनात थोडेशी काळजी घेणे अपेक्षित आहे. डासांपासून व्यक्तिगत संरक्षण करण्यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसविणे. डास पळविण्यासाठी अगरबत्तीचा धूर करणे, शरीरास डास प्रतिबंधक क्रीम लावणे यासह मच्छरदाणीचा वापर केल्यास डेंग्यूच्या डासांना दूर ठेवता येऊ शकेल. डासांना दूर ठेवता आल्यास डेंग्यूचा प्रादुर्भाव थांबवता येऊ शकेल.
स्वच्छतेची सवय ही अंगी बाणली तर साचलेल्या आणि घाण पाण्यापासून निर्माण होणारी डासांची पैदास रोखता येऊ शकेल. यामुळे आपोआपच डासांच्या उत्पत्तीला आळा बसून रोगराईपासून सर्वांचे संरक्षण होऊ शकेल. नागरिकांनी यासाठी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करायला हवे

1 comment: